पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ   

नवी दिल्ली :आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. याचा फायदा ग्राहकांना मिळायला हवा होता; परंतु सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात थेट २ रुपयांची वाढ केली आहे. 
 
सामान्य नागरिकांमध्ये यामुळे इंधन महागण्याची भीती निर्माण झाली होती.  उत्पादन शुल्कात वाढ झाली तरी सामान्य माणसाला त्याचा फटका बसणार नाही, असे सरकारने जाहीर केले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना (ओएमसी) पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती वाढवू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे किंमती कमी होण्याची शक्यता होती; पण सरकारने या संधीचा फायदा घेत शुल्क वाढवले. तरीही किरकोळ किंमती जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.
 
हा निर्णय तेल विपणन कंपन्यांसाठी आव्हानात्मक आहे. शुल्कवाढीमुळे त्यांचा नफा प्रति लीटर दोन रुपयांनी कमी होऊ शकतो. सध्या या कंपन्यांचा एकत्रित नफा ११ रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ही वाढ त्यांना सहन करणे शक्य आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Related Articles